चंडीगड - पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होताच पंजाब सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील नागरिकांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता, कोविड काळात राज्य परिवहन सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. मंजीतसिंग हे पंजाब परिवहन सेवेची बस चालवत होते. 26 एप्रिल 2020 रोजी कोविड कालावधीत त्यांचा मृत्यू झाला होता.
पीआरटीसी ड्रायव्हर मंजीत सिंह हे कर्तव्यावर असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. मंजीत सिंग यांच्या निधनानंतर पंजाबमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने 10 लाख रुपये मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांस देऊ केले. लॉकडाऊन काळात महाराष्ट्राच्या नांदेडमधील हुजूर साहिब येथे अडकलेल्या तिर्थक्षेत्र प्रवाशांना पंजाबमध्ये परत आणण्यासाठी पंजाब परिवहन सेवेच्या विषेश ड्युटीवर ते कार्यरत होते. यावेळी, कोविड कालावधील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये देण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली होती. त्यावेळी, मंजीत सिंग यांच्या कुटुंबीयांसही 50 लाख मदत निधीची मागणी आपने केली होती.