भागवतांना स्वयंसेवकांवर इतकाच विश्वास असेल स्वत:च्या सुरक्षा ताफ्यात कमांडो कशाला?- मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 10:49 AM2018-02-14T10:49:36+5:302018-02-14T10:49:51+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो.
लखनऊ: सरसंघचालक मोहन भागवत यांना आपल्या स्वयंसेवकांवर इतकाच विश्वास असेल, तर त्यांनी सरकारकडून देण्यात आलेली कमांडो सुरक्षा कशासाठी ठेवली आहे, असा सवाल 'बसपा'च्या सर्वेसर्वा मायावती यांनी विचारला.
मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो, अशा आशयाचे विधान केले होते. भागवत यांच्या या विधानावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी भागवत यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कराला सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भागवतांचे वक्तव्य हे जवानांचे मानसिक खच्चीकरण करण्यासारखे आहे. मोहन भागवत यांना आपल्या स्वंयसेवकांवर इतका विश्वास असेल तर सरकारी खर्चाने त्यांनी विशेष कमांडो आपल्या सुरक्षेसाठी का ठेवले आहेत, असा सवाल मायावतींनी विचारला. तसेच RSS ही आता सामाजिक संघटना राहिली नसून ती राजकीय झाली आहे. सामाजिक सेवेचा बुरखा पांघरून RSS भाजपाला निवडणुकीत मदत करत असल्याचा आरोपही मायावती यांनी केला.
नेमके मोहन भागवत काय म्हणालेत?
भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ आल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मोहन भागवत सध्या दहा दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी (11 फेब्रुवारी) मुजफ्फरनगर येथे संघाच्या बिहार व झारखंडमधील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भागवत म्हणाले की, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काही लष्करी संघटना नाही. देशाला गरज पडल्यास आणि देशाच्या संविधानाने.... (भाषण करताना पॉझ घेतला) तर भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी सहा ते सात महिने लागतील. मात्र, आम्ही संघाच्या स्वयंसेवकांना एकत्र करून अवघ्या तीन दिवसात सैन्य उभारून सज्ज होऊ शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ती क्षमता आहे.''
देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात, असं सांगतानाच 'भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वयंसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल,' असेही यावेळी भागवत यांनी सांगितले होते.