Bhaiyyuji maharaj suicide: भय्युजी महाराजांची इंग्रजीत लिहिलेली सुसाईड नोट सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:07 PM2018-06-12T16:07:08+5:302018-06-12T16:07:08+5:30
भय्युजी महाराजांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांची आई व पत्नी घरातच होत्या.
मुंबई: प्रसिद्ध धर्मगुरू भय्युजी महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या बातमीने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही वेळापूर्वीच त्यांच्या खोलीत आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली. इंग्रजी भाषेत लिहलेल्या या एकपानी पत्रात भय्युजी महाराजांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. आयुष्यातील ताणतणावांना मी कंटाळलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे भय्युजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
भय्युजी महाराजांनी हे पत्र लिहल्यानंतर लगेचच स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे समजते. भय्युजी महाराजांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांची आई व पत्नी घरातच होत्या. त्यांचे काही अनुयायीही घरात हजर होते. गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आल्यानंतर सर्वजण त्यांच्या खोलीच्या दिशेने धावले. त्यावेळी खोलीचे दार आतून बंद होते. भय्युजी महाराजांच्या अनुयायांनी हे दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भय्युजी महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.