नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी महिला प्रवासी आणि एअर इंडियाच्या डयुटी मॅनेजरमध्ये जोरदार वादावादी झाली. उशिरा पोहोचल्याने महिलेला विमानात प्रवेश नाकारण्यात आल्याने या वादाला सुरुवात झाली. हा शाब्दीक वाद इतका टोकाला गेला कि, दोघांनी परस्परांच्या कानाखाली लगावली. या महिलेला एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबादला जायचे होते.
ही महिला विमानतळावर पोहोचल्यानंतर लगेच चेकइन काऊंटरवर गेली. त्यावेळी काऊंटरवरील कर्मचा-याने तुम्हाला उशिर झाल्याने चेकइन करता येणार नाही असे सांगितले. स्टाफचे उत्तर ऐकून महिला प्रवाशाने काऊंटरवरील कर्मचा-याबरोबर हुज्जत घातली. त्यानंतर कर्मचा-याने तिला डयुटी मॅनेजरकडे पाठवले. डयुटी मॅनेजर एक महिला होती. महिला प्रवाशाने डयुटी मॅनेजरबरोबरही वाद घातला. दोघींमधल्या शाब्दीक बाचबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. संतापलेल्या महिलेने डयुटी मॅनेजरच्या कानाखाली मारली.
डयुटी मॅनेजरनेही प्रत्युत्तर देत महिलेच्या कानशिलात लगावली असे एअरपोर्टवरील डीसीपी संजय भाटीया यांनी सांगितले. महिला प्रवाशाने पहिला हात उगारला मग आत्मरक्षणासाठी एअर इंडियाच्या स्टाफनेही हात उगारला असे भाटीया यांनी सांगितले. महिला प्रवाशी नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्यानंतर दोघींनी परस्परांची माफी मागितली आणि वाद मिटला असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.