प्रशिक्षण संस्थेतून महिला सशक्तीकरणाला बळ, उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 02:22 AM2017-09-17T02:22:45+5:302017-09-17T02:24:12+5:30
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे शनिवारी विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे (आरव्हीटीआय)भूमिपूजन केले. तेलंगणातील हे पहिले कौशल्य विकास केंद्र असून, यासाठी १९.०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत
हैदराबाद : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे शनिवारी विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे (आरव्हीटीआय)भूमिपूजन केले. तेलंगणातील हे पहिले कौशल्य विकास केंद्र असून, यासाठी १९.०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. चार एकर जागेवर ही संस्था उभारण्यात येणार आहे. दरवर्षी किमान १,००० जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांच्या कौशल्यविकासाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
कौशल्यविकास, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती, तर राज्याचे उपमुख्यमंत्री मोहंमद महेमूद अली, गृहमंत्री नैनी नरसिंह रेड्डी, माजी मंत्री बंडारू दत्तात्रेय यांची उपस्थिती होती. विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी १,००० जणांना प्रशिक्षित करण्यात येणार असून, यात ४८० महिलांचा समावेश असणार आहे. या संस्थेत फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी, वास्तुकला सहायक, सौंदर्यप्रसाधन, फ्रं ट आॅफिस असिस्टंट, खाद्य आणि पेयपदार्थ, सेवा सहायक आदी अभ्यासक्रम आहेत.
यावेळी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, देशात प्रशिक्षक आणि शिक्षक यांची मोठी कमतरता आहे; पण आता प्रशिक्षणाच्या खूप संधी आहेत हे पाहून आपल्याला अतिशय आनंद होत आहे.
अर्थव्यवस्थेला ताकद
कौशल्यविकासाच्या माध्यमातून केवळ आपल्या देशाातील उद्योगांनाच नव्हे, तर जगातील अर्थव्यवस्थेला ताकद मिळणार आहे. कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, महिलांचे प्रशिक्षण आणि त्यांचे सशक्तीकरणाचे कार्य सरकार प्राधान्याने करीत आहे. प्रत्येक राज्यात एक विभागीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ११ कें द्रीय सरकारी संस्था आणि १,४०८ राज्य महिला आयटीआयच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशात पाच नव्या व्यावसायिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्याचेही नायडू यांनी सांगितले़