नवी दिल्ली - बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर लाठीचार्जप्रकरणी कुलगुरू गिरीशचंद्र त्रिपाठी अडचणीत आले आहेत. या वादग्रस्त प्रकरणामुळे गिरीशचंद्र त्रिपाठी यांचे सर्व अधिकारी काढून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे बनारस हिंदू विद्यापीठाचे मुख्य परीक्षाधिकारी (Chief Proctor) ओंकारनाथ सिंह यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाची राजीनामा सुपूर्द केला आहे. दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.के. सिंह बनारस हिंदू विद्यापीठाचे नवे मुख्य परीक्षाधिकारी होण्याची शक्यता आहे.
गिरीश चंद्र त्रिपाठी 26 नोव्हेंबरला विद्यापीठाच्या कुलगुरू पदाहून निवृत्त होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत सध्या ते आपल्या पदावरुन बाजूला हटणार नाहीत. दरम्यान, मंगळवारी आयुक्तांनी आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला असून या अहवालात घडलेल्या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाला जबाबदार ठरवलं आहे. यामुळे काँग्रेससहीत अन्य विरोधी पक्षांनी कुलगुरुंना तात्काळ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांवर लाठीमार करणा-यांवर कारवाई; तीन दंडाधिकारी, दोन पोलिसांना हटविले
दरम्यान, छेडछाडीच्या विरोधात निदर्शने करणा-या बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने तीन अतिरिक्त शहर दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिका-यांना हटविले.विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यपाल राम नाईक यांनी बनारस हिंदू विद्यापीठात घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. छेडछाडीच्या विरोधात शनिवार रात्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यात अनेक जण जखमी झाले होते. काही विद्यार्थी कुलगुरूंना भेटण्यास आग्रही होते. बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यावरून काँग्रेसने उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.समिती करणार चौकशीविद्यापीठात घडलेला प्रकार दु:खद असल्याचे राज्यपाल राम नाईक यांनी म्हटले आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. पोलिसांच्या वर्तनासह इतर पैलूंनी समिती चौकशी करील, असे राज्यपालांनी पत्रकारांना सांगितले होते.
काय आहे प्रकरण फाइन आर्ट्स अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीची बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी दोन दिवसांपूर्वी छेड काढली होती. त्याबाबत तिनं सुरक्षा रक्षकांकडे तक्रार केली असता, त्यांनी तिलाच उपदेशाचे डोस पाजले होते. अंधार झाल्यावर तू बाहेर काय करत होतीस, असं त्यांनी तिला विचारलं. हा सगळा प्रकार तिनं आपल्या मैत्रिणींना सांगितला होता, तेव्हा सगळ्यांनी मिळून धरणं आंदोलन करायचं ठरवलं होतं. आयआयटी-बीएचयू आणि महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरल्या होत्या. कुलगुरूंनी या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. परंतू, तेवढ्याने विद्यार्थिनींचं समाधान झालं नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोस्टर जाळून निषेध नोंदवला. त्यानंतरही आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होतं. पण, कुलगरू जी सी त्रिपाठी यांच्या घराबाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थिनींवर सुरक्षारक्षकांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती चिघळली.