नवी दिल्ली : प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला 'भारतरत्न' हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी 'भारतरत्न' पुरस्कारावर बहिष्कार घातला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला सन्मान न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी जाहीर केला आहे. याआधी 'भारतरत्न' पुरस्कार नाकारण्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांच्या निर्णयामुळे केंद्र सरकार समोर नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 'भारतरत्न' हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
तेज हजारिका यांनी सोमवारी रात्री उशीरा एका निवेदनाद्वारे 'भारतरत्न' पुरस्काराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाद्वारे आसाममध्ये आणि ईशान्य भारतामध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. भूपेन हजारिका यांचे नाव या वादग्रस्त विधेयकाशी जोडले जात आहे. अशा परिस्थितीत भूपेन हजारिका यांच्या नावाने 'भारतरत्न' जाहीर करून चुकीचा संदेश दिला जात आहे. या परिस्थितीत भूपेन हजारिका यांना 'भारतरत्न' देऊन देशात शांतता नांदणार नाही, असे तेज हजारिका यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, भूपेन हजारिका यांचे मोठे बंधू समर हजारिका यांनी 'भारतरत्न' पुरस्कार न स्वीकारण्याच्या निर्णयाला सहमत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'भारतरत्न पुरस्कार वापस करण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेजचा आहे. मात्र, या निर्णयाला मी सहमत नाही. भूपेन यांना पुरस्कार मिळण्यास आधीच उशीर झाला आहे. त्यामुळे भारतरत्न पुरस्काराचा सन्मान करुन आता तेजने हा पुरस्कार स्वीकारला पाहिजे'.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 'भारतरत्न' पुरस्कारांची घोषणा केली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक (मरणोत्तर) नानाजी देशमुख आणि प्रख्यात गायक भूपेन हजारिका (मरणोत्तर) यांना यंदाचा 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.