Congress Mallikarjun Kharge : राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या चार राज्यांमध्ये काही दिवसांपूर्वी मतदान पार पडले. या चार राज्यांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. चारपैकी केवळ तेलंगणा मध्ये काँग्रेसला भरघोस यश मिळताना दिसत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात अपेक्षेप्रमाणे भाजपाला मोठे यश मिळताना दिसत आहे. तर छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची लढाई सुरू असल्याचे चित्र आहे. चारपैकी तीन राज्यात दणका बसणार असल्याची चाहुल लागताच काँग्रेसकडून फोनाफोनी सुरू झाली असून विरोधकांना पुन्हा एकजूट करण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावली आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुढील सभा दिल्ली घेतली जाणार असून त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. विरोधी पक्षाची एकजूट करून भाजपाविरोधात २०२४च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनिती काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आखत आहे. लोकसभेच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात होते. पण या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसणार असल्याची चाहुल लागताच, काँग्रेसकडून तातडीने विरोधकांना फोनाफोनी करून बैठक बोलावली आहे. येत्या ६ डिसेंबरला ही बैठक दिल्लीत होणार आहे.