मुंबई: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. सोहेल कासकर हा दुबईमार्गे पाकिस्तानला फरार झाल्याने भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सोहेल कासकरला अमेरिकेतील तपास यंत्रणांनी अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक केली होती. या तपास यंत्रणांशी मुंबई पोलिस सातत्याने संपर्कात होते. कासकरने केलेला एक कॉल नुकताच ट्रेस करण्यात आला. त्यात तो पाकिस्तानला पळून गेल्याचे उघड झाले. त्यानंतर अमेरिकन तपास यंत्रणांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कासकर हा भारतात 'वॉन्टेड' होता. सोहेल कासकरला भारताकडे सुपूर्द करण्यासाठी मुंबई पोलिस सातत्याने अमेरिकन यंत्रणांशी संपर्कात होते. एका इंटरसेप्टेड फोन संभाषणात त्याचा आवाज भारतीय यंत्रणांनी ऐकला, त्यावेळी तो फरार होऊन पाकिस्तानात लपून बसल्याचे स्पष्ट झाले.
सोहेल कासकरकडून डी कंपनीच्या विविध कामांबद्दल माहिती मिळणं शक्य होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिस आणि अमेरिकन यंत्रणा कासकरच्या हस्तांतरणाच्या मुद्द्यावर सतत संपर्कात होते. कासकरवर भारतात कोणतेही मोठे खटले दाखल नसले तरीही तो मुंबई पोलिसांच्या रडारवर होता. दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याबद्दल त्याच्याकडून माहिती मिळाली असती. तसेच, कासकर हा डी कंपनीचा महत्त्वाचा माणूस असल्याने त्याच्याकडून डी कंपनीच्या कामाची पद्धत आणि त्यांच्या इतर गोष्टींची माहिती मिळण्यास मदत झाली असती. मात्र, सोहेल कासकर पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.