गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, १० वेळा होते आमदार, आता भाजपात जाण्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:56 PM2022-11-08T17:56:50+5:302022-11-08T17:57:31+5:30
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि १० वेळा आमदार राहिलेल्या मोहन सिंह राठवा यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि १० वेळा आमदार राहिलेल्या मोहन सिंह राठवा यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. राठवा हे गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान आता ते लवकरच भाजपामध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी मे महिन्यामध्ये मोहन सिंह राठवा यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, मी आता ७६ वर्षांचा झालो आहे. आता मी तरुणांना संधी देऊ इच्छितो. आता मी निवडणूक लढवणार नाही. नव्या तरुणांना संधी मिळाली पाहिजे. मी सातत्याने निवडणुका लढवल्या. त्यामधील १० वेळा मी जिंकून आलो. जेतपूर पावी, बोडेली आणि छोटा उदयपूर तालुक्यातील मतदारांनी मला सर्वाधिक वेळा जिंकवून गुजरात विधानसभेमध्ये पाठवले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मोहन सिंह राठवा हे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा शहरामध्ये सुरू होती. अखेरीस त्यांनी स्वत:च निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे मोहन सिंह राठवा यांचे सुपुत्र राजेंद्र सिंह राठवा मात्र गावोगावी, विवाह, भजन सोहळे यामध्ये हजेरी लावून मतदारांशी संपर्क ठेवत आहेत.