लखनऊ:उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मांस विक्रीसंदर्भात मोठा आदेश दिला आहे. आता राज्यात महापुरुषांच्या जयंतीदिनी आणि शिवरात्रीला कत्तलखाने आणि मांसाची दुकाने बंद राहणार आहेत. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव रजनीश दुबे यांनी यासंदर्भात सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना आदेश जारी करताना त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
याच अनुषंगाने 25 नोव्हेंबर म्हणजेच आज सिंधी समाजाचे संत टीएल वासवानी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील कत्तलखाने आणि मांसाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जारी केलेल्या आदेशात रजनीश दुबे यांनी म्हटले आहे की, आज टी.एल. वासवानी यांची जयंती आहे. सर्व शहरी भागात असलेल्या कत्तलखान्यांशिवाय मांसाची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
काय आहे नेमका आदेश ?आदेशात म्हटले आहे की, महावीर जयंती, बुद्ध जयंती, गांधी जयंती, शिवरात्री आणि साधू टीएल वासवानी यांच्या जयंतीनिमित्त शहरी भागात असलेल्या कत्तलखान्यांव्यतिरिक्त मांसाची दुकाने बंद ठेवण्यात येतील. त्यामागचा तर्क असा आहे की, अहिंसेचा संदेश देणारे महापुरुष आणि सण लक्षात घेऊन त्यांची जयंती अहिंसा दिन म्हणून साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, 2017 मध्ये सत्तेवर आल्यानंतरच योगी सरकारने बेकायदेशीर स्लोटर हाऊसवर कडक कारवाई केली होती. यासोबतच उघड्यावर मांसविक्रीवरही बंदी घालण्यात आली होती.