मोठी बातमी : मिठाईचा टिकाऊपणा नमूद करणे आता बंधनकारक ; १ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 05:19 PM2020-09-29T17:19:00+5:302020-09-29T17:21:01+5:30
मिठाई उत्पादकांमध्ये करणार जागृती
पुणे (पिंपरी) : ग्राहकांना चांगल्या दर्जाची उत्पादने मिळावीत यासाठी मिठाईचा टिकाऊपणा ग्राहकांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या एक ऑक्टोबर पासून मिठाई कोणत्या तारखेपर्यंत खाणे योग्य आहे, याचा कालावधी दर्शविणे आवश्यक असेल. फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसआयए) नुकतेच त्याबाबतचे आदेश दिले आहेत. जून 2020 पासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. एफएसएसआयएने येत्या 1 ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मिठाई पदार्थाचा ताजेपणाचा कालावधी अर्थात 'बेस्ट बिफोर' तारीख नमूद करावी लागेल.
ग्राहकांना चांगल्या प्रकारची दुग्धजन्य मिठाई मिळावी यासाठी ताजेपणाची खात्री देणे उत्पादकांवर बंधनकारक करण्यात आले आहे. मिठाई दुकानांमध्ये दर्शनी भागात सुट्टी मिठाई ठेवलेली असते. मागणी प्रमाणे त्यातील मिठाई बॉक्स मध्ये भरून दिली जाते. ही मिठाई कोणत्या तारखे पर्यंत सेवन करणे चांगले राहील याची माहिती नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. मिठाईच्या प्रकारानुसार पदार्थाच्या ताजेपणाची तारीख वेगळी असू शकते.
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे म्हणाले, फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सहसंचालकाना देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात याचा मिठाई उत्पादकांमध्ये प्रचार करण्यात येईल. त्या नंतरही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक अथवा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल.
----//
अंमलबजावणी अडचणीची ठरेल : चितळे
या निर्णयाची अंमलबजावणी करणे उत्पादकांसाठी अडचणीचे आहे. काही मिठाई दोन दिवस तर काही मिठाई आठ दिवसापर्यंत चांगली राहते. मिठाई ठेवलेल्या ताटा बाहेर बेस्ट बिफोर तारीख नमूद केली जाईल. मात्र, या निर्णयाचा संघटना विरोध करेल. कारण यामुळे नोकरशाही कडून मिठाई उत्पादकांना त्रासाला सामोरे जावे लागेल. बेस्ट बिफोरची अंमलबजावणी करताना त्याचा संघटनात्मक पातळीवर विरोधही केला जाईल. कारण मिठाई वगळता मांस देखील उघड्यावर विकले जाते. त्यांना असे बंधन नसल्याचे मिठाई आणि फरसाण असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले.