पाटणा - भर कार्यक्रमात गोळीबार केल्यानं बिहारच्या कटिहार येथील पोलीस अक्षीक्षक सिद्धार्थ मोहन जैन वादात अडकले आहेत. कार्यक्रम सुरू असताना त्यांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढली आणि कित्येक वेळा हवेत गोळीबार केला. जैन यांनी अचानक हवेत गोळीबार केल्यानं उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे एका आयपीएस अधिकाऱ्याच्या बेजबाबदार वागणुकीबाबत असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दरम्यान, लग्नसोहळा किंवा अन्य समारोहमध्ये गोळीबार करुन आनंद व्यक्त करण्यावर बंदी आहे. अशा गोळीबारात अनेकदा लोकांना जीव गमवावा लागला असल्याने हे प्रकार थांबण्यासाठी कायदे करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती असतानाही पोलीस अधीक्षकांकडून कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बिहार सरकारनं आयएएस आणि आयपीएस अधिका-यांची बदली केली. यादरम्यान, कटिहारचे डीएम मिथिलेश मिश्रा आणि पोलीस अधीक्षक सिद्धार्थ मोहन जैन यांचीही बदली करण्यात आली आहे. यानिमित्त दोन्ही अधिकाऱ्यांना गोल्फ मैदानात फेअरवेलची पार्टी देण्यात आली. याचाच आनंदोत्सव सुरू असताना जैन यांनी कायदा-सुव्यवस्थेचे नियम धाब्यावर बसवत लागोपाठ तब्बल आठ वेळा गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.