जातनिहाय जनगणनेसाठी बिहारचे नेते सरसावले; पंतप्रधान मोदींची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:51 AM2021-08-24T05:51:37+5:302021-08-24T05:51:55+5:30

मुख्यमंत्री नितीशकुमार, तेजस्वी यादव आदींचा सहभाग

Bihar leadersmet PM modi for caste-wise census | जातनिहाय जनगणनेसाठी बिहारचे नेते सरसावले; पंतप्रधान मोदींची घेतली भेट

जातनिहाय जनगणनेसाठी बिहारचे नेते सरसावले; पंतप्रधान मोदींची घेतली भेट

Next

नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार १० पक्षांच्या नेत्यांसोबत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. भेटीनंतर शिष्टमंडळ मोदी यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधानी दिसले. 

बैठकीनंतर नितीश कुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मोदी यांनी आमची मागणी नाकारलेली नाही. सरकारमधील एका मंत्र्याने म्हटले होते की, जातनिहाय जनगणना होऊ शकत नाही. त्यानंतर सगळ्या पक्षांत अस्वस्थता होती.” राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, “जातनिहाय जनगणनेमुळे शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीलाही लाभ होईल. यावर सगळ्या पक्षांचे एकमत आहे. मंडल आयोगाच्या आधी देशात किती जाती आहेत, हेच माहीत नव्हते.”

बैठकीत सहभागी भाकपचे (माले) महबूब आलम म्हणाले की, “दलित, मागासलेल्यांना राखीव जागांची ५० टक्के मर्यादा आहे; पण लोकसंख्येत हा वर्ग ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणून दलित-मागास समुदायाची जनगणना होईल तेव्हाच राखीव जागा व सरकारी योजनांचा खराखुरा लाभ त्यांना मिळेल.”

ओबीसीची जनगणना शक्य 
n    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बब्बन तायवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, “ज्या मुद्द्यावर बिहारमधील सर्व पक्ष पुढे आले त्यावर यंदाच्या जनगणनेत जातींनाही समाविष्ट केले जाईल, अशी आशा आहे.
n    ओबीसी महासंघ गेल्या २५ वर्षांपासून ही मागणी करीत आहे. सरकारची इच्छा असेल तर २०२१ मध्ये हे शक्य आहे. म्हणून एससी, एसटीसोबत ओबीसीचा एक कॉलम जोडला जावा. जनगणना डिजिटल माध्यमातूनच होणार असल्यामुळे काही अडचण येणार नाही.”
n    संसदेने संमत केलेल्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास जातींची आपली यादी बनवण्याचा अधिकार मिळाला आहे. 

रूपरेषा तयार
n    संसद अधिवेशनात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत फक्त अनुसूचित जाती आणि जनजातींचीच मोजणी करणार, असे म्हटले होते.
n    २०२१ च्या जनगणनेची रूपरेषा तयार असली तरी कोरोनामुळे ते काम सुरू झालेले नाही.

या नेत्यांनी घेतली भेट
मोदींना भेटलेल्या शिष्टमंडळात १० पक्षांचे ११ नेते सहभागी होते. त्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जनता दलाचे (संयुक्त) विजय कुमार चौधरी, भाजपचे जनक राम, काँग्रेसचे अजित शर्मा, 
भाकपचे (माले) महबूब आलम, एआयएमआयएमचे अख्तरुल ईमान, हमचे जितन राम मांझी, व्हीआयपीचे मुकेश साहनी, भाकपचे सूर्यकांत पासवान आणि माकपचे अजय कुमार यांचा समावेश होता.

Web Title: Bihar leadersmet PM modi for caste-wise census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.