बिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2015 03:28 AM2015-11-27T03:28:24+5:302015-11-27T03:28:24+5:30
बिहारमध्ये पुढील वर्षी १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी ही घोषणा केली. या निर्णयामुळे
पाटणा : बिहारमध्ये पुढील वर्षी १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी ही घोषणा केली. या निर्णयामुळे गुजरात, केरळ, मणिपूर व नागालॅण्डनंतर दारूबंदी लागू करणारे बिहार हे देशातील पाचवे राज्य ठरेल.
नितीशकुमार यांनी येथे मद्यनिषेध दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलताना सांगितले की, १ एप्रिल २०१६पासून राज्यात दारूबंदी लागू करण्यात येणार असून, यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत. राज्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येत आहे. दारूबंदी धोरण लागू केल्याने ४ हजार कोटी रुपयांचा महसूल कमी होणार असून, त्याच्या भरपाईसाठी वेगळ्या उपाययोजना केल्या जातील, असेही नितीशकुमार म्हणाले.
नितीशकुमारांना धमकी
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एसएमएसद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पाटणा शहरातील श्रीकृष्णापुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक विकास वैभव यांनी ही माहिती दिली. नितीशकुमार यांना झेड प्लस सुरक्षेचे कवच आहे. परंतु या धमकीनंतर त्यांची सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.