बिहार- राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा पुत्र अर्जित शाश्वत याला अटक करण्यात आली आहे. सांप्रदायिक हिंसा भडकावल्याच्या आरोपात अर्जितला भागलपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याला भागलपूर कोर्टात हजर केलं जाणार आहे. अर्जित शाश्वत याच्यावर 17 मार्च रोजी भागलपूर येथे निघालेल्या मिरवणुकीदरम्यान हिंसा भडकावण्याचा आरोप आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जित शाश्वत हा पटना येथे ट्रेनमधून उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेरील महावीर मंदिराजवळून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करत असताना अर्जित शाश्वत याच्या समर्थकांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली आहे. त्याच वेळी पोलिसांवर त्यांचे कार्यकर्ते धावून गेले आहेत. सध्या तरी अर्जित शाश्वत यानं आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जातोय. तसेच अर्जित शाश्वत यानं भागलपूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. परंतु न्यायालयानं तो फेटाळून लावला होता.अर्जित शाश्वत चौबेला अटक करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या दबाव होता. दोन समाजांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी न्यायालयानं त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केलं होतं. अर्जित शाश्वत याला अटक होत नसल्यानं आरजेडी नेते तेजस्वी यादव, सुब्रमण्यम स्वामी आणि लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर निशाणा साधला होता. अखेर त्याला आज अटक करण्यात आली आहे.
सांप्रदायिक हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली अर्जित शाश्वत याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 7:47 AM