नवी दिल्ली - बिहारच्या पाटणामध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एक जीप पुलावरून गंगेत कोसळली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दानापूरच्या पीपापूल भागात प्रवाशांनी भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामधून जवळपास 15 प्रवासी प्रवास करत होते. यातील 8 जणांचे मृतदेह हाती लागलेत. तर अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठई 'एनडीआरएफ'कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं गंगेत बुडालेली गाडी बाहेर काढली. तसेच स्थानिकांच्या मदतीनं गंगा नदीत मृतदेहांचाही शोध घेण्यात आला. याच दरम्यान आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मृतांमध्ये 75 वर्षीय रमाकांत सिंह, 60 वर्षीय गीता देवी, 50 वर्षीय अरविंद सिंह, 65 वर्षीय सरोजा देवी, 8 वर्षीय आशीष, 75 वर्षीय अनुराधा देवी, 12 वर्षीय एक मुलगा आणि 14 वर्षीय एका मुलीचा समावेश आहे. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. वेगाने बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी याआधीही अनेकदा दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.