Nitish Kumar Bihar Politics: आजचा दिवस बिहारच्याराजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राजकीय गोंधळादरम्यान नितीश कुमार आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात. ते महाआघाडीतून बाहेर पडून NDA मध्ये सामील होऊ शकतात. आज पुन्हा एकदा नितीशकुमार यांचा शपथविधी होऊ शकतो, म्हणजेच ते नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. नितीश कुमार यांच्यासह अनेक मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. राजभवनात होणाऱ्या शपथविधीची तयारी जोरात सुरू झाली असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
बिहारमधील राजकीय घडामोडी पाहता सुट्टीच्या दिवशी सचिवालय सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार दुपारी १२ वाजता राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करू शकतात. त्याच वेळी, दुपारी ४ वाजता ते नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. त्याआधी सकाळी १० वाजता जेडीयू विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यानंतर NDA विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नितीश कुमार बिहारच्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील, अशी चर्चा आहे.
नितीशच्या मंत्रिमंडळात भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री!
रविवारी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यास ते विक्रमी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील. नितीश कुमार यांच्यासह अनेक मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेत्या रेणू देवी यांचे नाव निश्चित मानले जात आहे, तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर विचारमंथन सुरू आहे. राजकीय घमासानादरम्यान शनिवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडी मंत्र्यांना कामकाज करू नका असे सांगितले.
नितीशकुमार नवव्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता
- पहिली वेळ- 3 मार्च 2000
- दुसरी वेळ- 24 नोव्हेंबर 2005
- तिसरी वेळ- २६ नोव्हेंबर 2010
- चौथी वेळ- 22 फेब्रुवारी 2015
- 5वी वेळ- 20 नोव्हेंबर 2015
- सहावी वेळ- 27 जुलै 2017
- 7वी वेळ- 16 नोव्हेंबर 2020
- 8वी वेळ- 9 ऑगस्ट 2022
- 9वी वेळ- 28 जानेवारी 2024 (संभाव्य)