जयपूर : राजस्थानच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक ब्यूरोने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे मारले असून, त्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आढळली आहे. उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ब्यूरोचे महासंचालक भगवान लाल सोनी यांनी सांगितले की, उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक माया मिळविणाऱ्यांविरुद्ध राज्यात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता गिरीश कुमार जोशी, बूंदी जिल्ह्यातील पंचायत समितील सहायक विकास अधिकारी चिरंजीलाल व रीको जयपूरमधील सिनिअर डी.जी.एम. सतीश कुमार गुप्ता यांच्या निवासस्थानांची झडती घेतली होती. अधीक्षक अभियंता गिरीश कुमार जोशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या चार ठिकाणांवर विविध पथकांनी झडती घेतली. त्यात चल-अचल संपत्तीची कागदपत्रे आढळरूी.
मोठ्या प्रमाणावर आढळली आहेत. यात श्योभागपुरा (उदयपूर) मध्ये व्यावसायिक भूखंड, कुंडाल गावात मोठी जमीन, पावडिया गावात शेती, अनेक भूखंड, दुकानांची कागदपत्रे, विविध बँका व टपाल खात्यात एकूण २३ खाती, यात सुमारे २५ लाख रुपये जमा, नकदी रक्कम, सोन्याचे दागिने आढळले आहेत. या चल-अचल संपत्तीची बाजारभावानुसार, किंमत २० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. सहायक विकास अधिकारी चिरंजीलाल यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून त्यांच्या ठिकाणांची झडती घेण्यात आली. यात अनेक फ्लॅट, भूखंड, शेतीची कागदपत्रे, १० लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे सोन्या-चांदीचे दागिने आढळले आहेत. या चल-अचल संपत्तीची बाजारभावानुसार किंमत १३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
जयपूरमधील सिनिअर डी.जी.एम. सतीश कुमार गुप्ता यांच्या दोन ठिकाणांची झडती घेण्यात आली. यात अलवरमध्ये शेती, चार घरे, २१ दुकानांची कागदपत्रे, १५ निवासी भूखंडाची कागदपत्रे, विविध बँकांमध्ये २० खाती, ८० लाख रुपये मूल्याचे एक किलो ४०० ग्रॅम सोने व चांदीचे दागिने आढळले आहेत. या चल-अचल संपत्तीची किंमत सुमारे २० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.