- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात लोकसंख्यावाढीला आळा घालण्याची गरज व्यक्त करतानाच तिन्ही सैन्य दलांचा एक संयुक्त प्रमुख नेमण्याची घोषणा केली होती. त्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार असून, त्यासाठी संरक्षण मंत्रालय समिती नेमणार आहे. मात्र, सध्याचे लष्कर प्रमुख बिपीन रावत हेच तिन्ही सैन्य दलांचे संयुक्त प्रमुख होतील, असे समजते.सध्या हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ हे चीफ आॅफ स्टाफ कमिटीचे प्रमुख आहेत; पण ते ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत असून, नव्या संयुक्त प्रमुखाची निवड होण्यास एक महिना लागणार असल्याने धनोआ यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे. बिपीन रावत हे ३१ डिसेंबरपर्यंत सेवेत राहणार असल्याने आणि ते सेवेत ज्येष्ठ असल्याने त्यांची सैन्य दलाचे संयुक्त प्रमुख म्हणून निवड होण्याची चर्चा आहे.सैन्य दलाच्या प्रमुखाची भूमिका सरकारचा लष्करविषयक सल्लागार व समन्वयक, अशी असू शकेल. तिन्ही दलांना लागणारी शस्त्रे, सुविधा, त्यांची खरेदी, युद्धनीतीचे नियोजन या साऱ्या बाबतीत तो थेट पंतप्रधान व संरक्षणमंत्री यांना सल्ला व माहिती देत राहील. त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असला तरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापेक्षा तो कनिष्ठ असेल. तिन्ही दलाचे सध्याचे जे प्रमुख असतात, त्यांच्याही वर या संयुक्त सैन्य प्रमुखाचे स्थान असेल.
बिपीनकुमार रावत होणार संयुक्त सैन्य दल प्रमुख?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 4:56 AM