#BIRTHDAYSPECIAL : जावेद अख्तर यांची 'ही' ५ गाणी आजही आपल्या सर्वांची फेव्हरीट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 07:26 PM2018-01-16T19:26:46+5:302018-01-16T19:52:34+5:30
सुप्रसिध्द गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या अनेक अजरामर कलाकृती आपल्याला माहीत आहेत.
मुंबई : प्रसिध्द गीतकार आणि शायर जावेद अख्तर यांचा आज ७२वा वाढदिवस. त्यांनी आजवर बॉलिवूडला अनेक अजरामर संगीत आणि गीतांची भेट दिली. सहकारी सलीम खान यांच्यासोबत केलेल्या अजरामर कामांची पावती वेळोवेळी प्रेक्षकांनी त्यांना दिली आहे. नव्वदच्या दशकात आलेल्या अंदाज, सीता और गीता, शोले, डॉन, यादों की बारात, जंजीर, दीवार, हाथ की सफाई, चाचा भतिजा, त्रिशुल, क्रांती, झमाना, लगान, मि. इंडीया, काला पथ्थर, शान आणि हाथी मेरे साथी यांसारख्या चित्रपटांना त्यांनी आपली अजरामर कलाकृती बनवलं. तेव्हाच्या चित्रपटातील अनेक गाणी आजच्या तरुणाईचीसुध्दा आवडती आहेत. तेव्हाची त्यांची गाणी तरुणांना जितकी आवडत होती तितकीच आजची गाणीसुध्दा आजच्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. अनेकांच्या मोबाईलची ती कॉलरट्युन आहेत तर अनेकांच्या फेव्हरिट प्लेलिस्टमध्ये आहेत. पाहूयात त्यापैकी ही काही गाणी जी तुमची आमची सर्वांची फेव्हरीट आहेत.
१) इकतारा - वेक अप सिड
कोंकणा सेन शर्मा आणि रणबीर कपूर यांच्या वेक अप सिड या 2009 साली आलेल्या चित्रपटातील हे गाणं आजही अनेकांचं फेव्हरीट आहे. कविता सेठ यांच्या स्वरातील या गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांनी संगीत दिलेलं आहे.
२) युहीं चला चल राही - स्वदेस
२००४ साली आलेल्या शाहरुख खानच्या स्वदेस या चित्रपटातील हे गाणं आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहेच. उदीत नारायण, कैलाश खैर आणि हरिहरन यांच्या स्वरात या गाण्याचे शब्द आणि संगीत फक्त ऐकत राहावेसे वाटतात.
आणखी वाचा - #BirthdaySpecial : वाचा गीतकार जावेद अख्तर यांच्या 'या' काही खास शायरी
३) कल हो ना हो
शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रिती झिंटाच्या कल हो ना हो या चित्रपटाचं शीर्षकगीत सर्वांना आजही आवडतं. त्याच्या शब्दांपासून, संगीतापासून ते चित्रीकरणापर्यंत सगळंच प्रेक्षकांना फार आवडलं. या गाण्यात सोनू निगम यांच्या आवाजाने शंकर एहसान लॉय यांच्या संगीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
४) कैसी है यह रुत के - दिल चाहता है
२००१ साली आलेल्या आमीर खान, सैफ अली खान, प्रिती झिंटा, डिंपल कपाडियाँ आणि अक्षय खन्ना यांच्या चित्रपटातील हे अजरामर गाणं. डिंपल आणि अक्षय खन्नावर चित्रीत या गाण्याला आवाज दिलाय श्रीनिवास यांनी आणि संगीत दिलंय शंकर-एहसान-लॉय यांनी.
५) राधा कैसे ना जले - लगान
२००१ साली आलेल्या लगान या चित्रपटातील राधा कैसे ना जले हे सर्वांच्याच आवडत्या गाण्यांपैकी एक. या गाण्याला आवाज दिलाय उदीत नारायण, आशा भोसले आणि वैशाली सामंत यांनी. तर संगीत दिलंय ऑस्कर विजेते ए. आर. रहमान यांनी. आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्यासह ब्रिटीश अभिनेत्री रशेल शेली हिच्यावर हे गाणं चित्रीत केलं गेलंय.