Sanjay Nisahd on Shri Ram: “श्रीराम दशरथाचे नाही, तर श्रृंगी ऋषी निषादांचे पुत्र; रामनामावर केवळ राजकारण होतंय”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 06:33 PM2021-11-09T18:33:06+5:302021-11-09T18:35:07+5:30
Sanjay Nisahd on Shri Ram: प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हतेच. तर श्रृंगी ऋषी निषाद यांचे ते पुत्र होते, असे निषाद यांनी म्हटले आहे.
प्रयागराज: उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. यामुळे उत्तर प्रदेशचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या निषाद पक्षाच्या संजय निषाद यांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे पुत्र नव्हतेच. तर श्रृंगी ऋषी निषाद यांचे ते पुत्र होते, असे निषाद यांनी म्हटले आहे. यामुळे आता भाजपच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे म्हटले जाते की, राजा दशरथांना एकही अपत्य नव्हते आणि श्रृंगी ऋषींनी त्यांना एक यज्ञ करायला सांगितला. दशरथांनी आपल्या तीनही राण्यांना विशेष खीर दिली आणि प्रभू श्रीरामांचा जन्म त्यांच्या आईने खीर खाल्ल्यानंतर झाला. परंतु, वास्तवात केवळ खीर खाल्याने कुणीही गर्भवती होत नाही. त्यामुळे राम दशरथांचे कथित पुत्र होते, ते श्रृंगी ऋषि निषाद यांचे खरे पुत्र होते. श्रीरामांचे आई-वडील आणि अयोध्यावासीय त्यांना समजू शकले नाहीत, निषाद राज्यानेच त्यांच्या खऱ्या शक्तीला ओळखले. जो देवाला ओळखतो त्याचा तो श्रेष्ठ ठरतो. निषाद राज्याचाही हाच दर्जा आहे, असा वादग्रस्त दावा संजय निषाद यांनी प्रयागराज येथे बोलताना केला. यानंतर अयोध्येतील संत मंडळी प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे.
संजय निषाद यांचे वक्तव्य आणि भाषा आक्षेपार्ह
संजय निषाद यांचे वक्तव्य आणि भाषा आक्षेपार्ह आहेच. तसेच याद्वारे त्यांनी प्रभू श्रीरामाचा आणि त्यांच्या भक्तांचाही अपमान केला आहे. निषाद यांनी चर्चेत येण्यासाठी ईशनिंदा करणारे वक्तव्य केले, असे अयोध्येतील संतमंडळींनी म्हटले आहे. दुसरीकडे, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या विधानासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले आहे. घप्रमुख तर डीएनए एक्सपर्ट आहेत. त्यांनी या प्रकरणावर नक्कीच स्पष्टीकरण द्यायला हवे, असे सांगत ओवेसी यांनी भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, या प्रकरणावर वाद वाढत असल्याचे पाहून संजय निषाद यांनी आपले वक्तव्य चुकीच्या संदर्भासहीत मीडियाने दाखवल्याचा दावा केला आहे. आपण केवळ प्रभू श्रीरामाचे गुण आणि त्यांची महानतेचा गौरव करत होतो. तसेच निषाद समाज कशा पद्धतीने प्रभू श्रीरामाशी निगडीत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असे संजय निषाद यांनी म्हटले आहे.