नवी दिल्ली : २०१४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांत सर्व राजकीय पक्षांनी खर्च केलेल्या निधीतील एकट्या भाजपचा वाटा ६० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे.
एडीआरच्या अहवालात म्हटले आहे की, २१0४ च्या महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांत सर्व राजकीय पक्षांनी केलेला खर्च ३६२.८७ कोटी रुपये होता. त्यातील एकट्या भाजपचा खर्च २२६.८२ कोटी रुपये होता. दुसऱ्या स्थानी असूनही काँग्रेसचा खर्च अवघा ६३.३१ कोटी रुपये होता.सर्व राजकीय पक्षांनी केलेल्या ३६२.८७ कोटींच्या खर्चापैकी प्रसिद्धीवर सर्वाधिक २८०.७२ कोटी रुपये (७७.३६ टक्के) खर्च करण्यात आले. त्याखालोखाल ४१.४० कोटी रुपये प्रवासावर खर्च करण्यात आले.प्रसिद्धीवरील खर्चातही भाजप आघाडीवर आहे. भाजपने १८६.३९ कोटी रुपये प्रसिद्धीवर खर्च केले. सर्व राजकीय पक्षांनी प्रसिद्धीवर खर्च केलेल्या एकूण निधीपैकी ६६.४० टक्के निधी एकट्या भाजपने खर्च केला आहे.
सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपने सर्वाधिक २९६.७४ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. यातील ५८.६९ टक्के निधी (१७४.१५९ कोटी) भाजपच्या केंद्रीय मुख्यालयाने गोळा केला होता. भाजपच्या महाराष्ट्र शाखेने १२२.२८ कोटी, तर हरियाणा शाखेने ०.३०३ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. निधी गोळा करण्याच्या बाबतीतही काँग्रेस दुसºया स्थानी राहिली. काँग्रेसने ८४.३७ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. काँग्रेसच्या केंद्रीय मुख्यालयाने यातील १६.५५ कोटी रुपये गोळा केले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ६२.७४ कोटी रुपयांचा (७४.३६ टक्के) आणि हरियाणा प्रदेश काँग्रेसने ५.०८३ कोटी रुपयांचा निधी गोळा केला होता. (वृत्तसंस्था)