“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:38 AM2024-06-01T11:38:08+5:302024-06-01T11:38:18+5:30

Amit Shah News: राहुल गांधींकडे जेव्हापासून काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे, तेव्हापासून काँग्रेस नकारात्मकतेकडेच झुकली आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली.

bjp amit shah criticized congress for not participating exit poll discussion for lok sabha election 2024 | “काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह

“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह

Amit Shah News: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल येणार आहेत. ०४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. मात्र, या एक्झिट पोलवरूनही आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी होण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. याबाबत हायकमांडने निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या निर्णयावरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

०१ जून रोजी जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलसंदर्भात माध्यमांवर होणाऱ्या कोणत्याही चर्चेत काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. ०४ जून रोजी निकाल जाहीर होईल, तेव्हा तो निकाल सर्वांसमोर असेल. माध्यमांच्या टीआरपीसाठी अशा कोणत्याही चर्चेत सहभागी होण्याचे समर्थन आम्ही करत नाही. ०४ जूनच्या निकालानंतर माध्यमांवर होणाऱ्या चर्चेत काँग्रेस पक्ष आनंदाने सहभागी होईल, अशी माहिती काँग्रेस नेते पवन खेरा यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये दिली आहे.

काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही

लोकसभा मतदान सुरु झाले, त्या दिवसापासूनच काँग्रेस पक्ष नकारात्मक मूडमध्ये आहे. ज्या प्रचारसभा काँग्रेसने घेतल्या त्यात त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात आले की त्यांनाच बहुमत मिळेल. पण त्यांना हे पक्के ठाऊक आहे की, त्यांचा दारुण पराभव होणार आहे. त्यामुळेच कुणीही एक्झिट पोल्सनंतरच्या चर्चांमध्ये सहभाग घेणार नाही. राहुल गांधींकडे जेव्हापासून काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे, तेव्हापासून काँग्रेस नकारात्मकतेकडेच झुकली आहे. पराभव होणार आहे हे पटल्यानेच काँग्रेसने एक्झिट पोल्सवर बहिष्कार घातला आहे. सल्ला देईन की, अशा प्रकारे पलायन करु नये उलट आत्मचिंतन केले पाहिजे, या शब्दांत अमित शाह यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने लागतील, असा काँग्रेसचा विश्वास आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा दावा आहे की, ०४ जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएचे अनेक मित्रपक्ष इंडिया आघाडीत सहभागी होतील. दोन टप्प्यांनंतरच इंडिया आघाडीला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, यूपी, बिहार, तेलंगणा, हरियाणा या राज्यांमध्ये काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केली आहे, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. 
 

Web Title: bjp amit shah criticized congress for not participating exit poll discussion for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.