भाजप आणि काँग्रेसमध्ये पेटले वाक्युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2015 12:01 AM2015-06-27T00:01:55+5:302015-06-27T00:01:55+5:30
भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणारा आयपीएलचा घोटाळेबाज माजी आयुक्त ललित मोदी याने आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळविला आहे
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणणारा आयपीएलचा घोटाळेबाज माजी आयुक्त ललित मोदी याने आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळविला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका व जावई रॉबर्ट वाड्रा हे लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये आपल्याला भेटले होते, असा दावा त्याने केला आहे. मोदीच्या या टिष्ट्वटबॉम्बनंतर काँग्रेस व भाजपत वाक्युद्ध पेटले आहे.
आतापर्यंत बचावात्मक पवित्र्यात असलेल्या भाजपने काँग्रेसला या भेटीमागील हेतू स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने ललित मोदीचा दावा फेटाळताना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये अचानक एकमेकांपुढे येणे हा काही गुन्हा नाही, असे स्पष्ट केले आहे.
ललित मोदी व गांधी कुटुंबातील संबंधांमुळेच संपुआच्या काळात माजी आयपीएल प्रमुखाचे प्रत्यार्पण होऊ शकले नाही, असा आरोप भाजपने केला आहे. सोनिया गांधी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. भाजपच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने ललित मोदी यांचे टिष्ट्वट म्हणजे छोट्या मोदीने (ललित मोदी) खोटारडेपणा करून मोठ्या मोदीची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) मदत करण्याचा प्रयत्न आहे, असा घणाघाती आरोप केला.
या मुद्यावर काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की, ललित मोदीने गांधी कुटुंबियांचीही भेट घेतली होती हे आता उघड झाले आहे. त्याने प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांना भेटण्यामागे कारण काय होते? गांधी कुटुंब मागील काही वर्षांपासून मोदीच्या संपर्कात का होते हे स्पष्ट झाले पाहिजे.
भाजपच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला चढविताना ललित मोदी भाजपच्या इशाऱ्यावर मूळ मुद्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. रेस्टॉरंटमध्ये अचानक कुणी भेटले तर तो गुन्हा ठरत नाही, असे या पक्षाचे म्हणणे आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की, भाजपने आपल्या लोकांना या मुद्यावर लोकांची दिशाभूल करू नका, असे सांगितले पाहिजे व सरकारने परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांबाबत देशवासीयांना स्पष्टीकरण द्यावे.
दरम्यान, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या समर्थनात आमदारांनी स्वाक्षरी मोहीम उघडली असून १२० आमदारांचे हस्ताक्षर घेण्यात आले असल्याच्या वृत्ताचा मुख्यमंत्री कार्यालयाने इन्कार केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात मुख्यमंत्री दर शुक्रवारी लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेत असतात. आमदार आणि कार्यकर्त्यांचे त्यांना भेटणे हा त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना व्यक्तिश: फोन करून आपल्या प्रति इमान राखण्याचे आणि समर्थनात पुढे येण्याचे आवाहन केले असल्याचे वृत्त कार्यालयाने फेटाळले आहे.
ललित मोदी स्वत:च्या बचावासाठी निराधार आरोप करीत असल्याचा दावा केंद्रीय कायदामंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी केला आहे. मोदीने प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्राचे नाव घेतले. उद्या तो आणखी कुणाचे नाव घेईल. आपल्याविरुद्धच्या खटल्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असे गौडा यांनी सांगितले.