बुलेट ट्रेनवरून भाजपा-काँग्रेसमध्ये गरमागरमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 03:40 AM2018-07-26T03:40:59+5:302018-07-26T03:44:06+5:30
लोकसभेत वादळी चर्चा; प्रकल्पाचा खर्च अवाजवी असल्याचा विरोधकांचा आरोप
नवी दिल्ली : मुंबई-अहमदाबादमधील बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन भाजप व विरोधी पक्षसदस्यांमध्ये बुधवारी लोकसभेत गरमागरमी झाली. या प्रकल्पाचा खर्च अवाजवी असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी घेतला तर मागील सरकारनेच आपल्या संकुचित राजकीय लाभासाठी हा प्रकल्प मंजूर केला असा आरोप भाजपने केला.
१.१० लाख कोटी रुपये खर्चाच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले की, इतका प्रचंड पैैसा या प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा त्याच पैशातून देशातील हजारो किलोमीटरचे रेल्वेमार्ग दुहेरी करता येतील किंवा नवी रेल्वेमार्ग बांधता येतील.
काँग्रेसप्रणित मागील सरकारने राजकीय लाभ मिळविण्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला असा आरोप करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, रेल्वेच्या आर्थिक स्थितीकडे कानाडोळा करुन तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघांसाठी काही रेल्वे प्रकल्पही मंजूर करुन घेतले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानने पन्नास वर्षांसाठी ०.१ टक्के व्याजदराने कर्ज दिले आहे. कर्ज दिल्यानंतर पहिली
पंधरा वर्षे त्याची परतफेड केली नाही तरी चालणार आहे. तसे यासंदर्भातील करारात नमूद करण्यात आले आहे. ४० वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारने जे रेल्वे प्रकल्प संमत केले होते तेही त्यांना पूर्ण करता आले नाहीत अशी त्यांची अकार्यक्षम राजवट होती.
पीयूष गोयल यांच्या वक्तव्याचा केला निषेध
गोयल यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार निषेध केला. त्याला त्याच पद्धतीने भाजपा खासदारांनीही सभागृहात उत्तर दिले.
या गदारोळामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भातील प्रश्नाची चर्चा तिथेच थांबवून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढचा प्रश्न घेतला.
पीयूष गोयल यांनी असेही सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगरहवेली येथील १२ जिल्ह्यांतील १,४८४ हेक्टर जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.