अब की बार 250च्या पार; भाजपाला अनुकूल सट्टा बाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:21 PM2019-03-18T13:21:03+5:302019-03-18T13:23:46+5:30
सत्ता बाजारात भाजपाची हवा; काँग्रेसला धक्का बसण्याचा अंदाज
जैसलमेर: सध्या देशातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याची आकडेवारी 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पुढे येईल. मात्र सध्या सट्टा बाजारानं भाजपाला कौल दिला आहे. येत्या निवडणुकीत भाजपाला 250 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज सट्टा बाजाराकडून वर्तवण्यात येत आहे.
भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला 300 हून अधिक जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधील सट्टा बाजारानुसार काँग्रेसला देशात आणि राज्यातही फारसं यश मिळणार नाही. काँग्रेसला 100 जागा मिळतील, असा अंदाज आधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता काँग्रेसला केवळ 72 ते 74 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या काँग्रेसला राज्यात धक्का बसेल, असा अंदाज आहे. राजस्थानातून एकूण 25 खासदार लोकसभेत जातात. यातील 18 ते 20 जागांवर भाजपाला यश मिळू शकतं.
गेल्याच महिन्यात पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. यानंतर हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. हवाई दलाच्या या धडाकेबाज कारवाईचा फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. या कारवाईमुळे मोदी सरकारला अनुकूल वातावरण निर्माण झालं. पंतप्रधान मोदींचं नेतृत्व अतिशय सक्षम असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाल्याचं सट्टा बाजारातील बुकी सांगतात. एअर स्ट्राइकच्या आधी सट्टा बाजारातील बुकींनी भाजपाला 200 हून अधिक, तर एनडीएला 280च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता.