ना फडणवीसांचं ऐकलं, ना चंद्रकांतदादांचं; भाजपाश्रेष्ठींनी शेवटी खडसेंचं तिकीट कापलंच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:51 AM2020-03-13T11:51:58+5:302020-03-13T12:11:05+5:30
खडसे यांच्याऐवजी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देऊन भाजपश्रेष्ठींनी सर्वांनाच चकित केले पण...
मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रदेश भाजपने एकमताने साकडे घालूनही भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी खडसे यांना संधी नाकारली.
गेली काही वर्षे सातत्याने बेधडक विधाने करणारे, बंडाची भाषा करणारे खडसे यांना खासदारकी न देता अशी भाषा पक्षात खपवून घेतली जाणार नाही आणि अशी भाषा करणाऱ्यांच्या दबावासमोर झुकणार नाही, असा संदेश भाजपच्या श्रेष्ठींनी दिला असे म्हटले जात आहे.
खडसे यांच्याऐवजी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देऊन भाजपश्रेष्ठींनी सर्वांनाच चकित केले पण सुरुवातीपासून निष्ठेने पक्षसंघटनेत काम करणा-याला संधी दिली गेली. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे ते निकटवर्ती होते. मुंडे यांच्या निधनानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. ते वंजारी समाजाचे आहेत.
आठवले, भोसलेंचे अर्ज
भाजपतर्फे रामदास आठवले, उदयनराजे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. गो कोरोना, कोरोना गो, असे म्हणतानाच आठवले यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ‘आता लवकरच गो महाविकास आघाडी गो’, होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना दिली.
काकडे म्हणतात, नाराज नाही
उमेदवारी न मिळाल्याने मी नाराज नाही. मात्र, एकनाथ खडसे यांना संधी न मिळाल्याने नाराज आहे, अशी प्रतिक्रिया संजय काकडे पुण्यात माध्यमांना दिली. ते म्हणाले, रामदास आठवले, उदयनराजे बाहेरून आलेले आहेत, मीदेखील बाहेरून आलो आहे. तिघेही तसेच नकोत म्हणून कदाचित मला संधी नाकारली असेल. मला राज्यात इंटरेस्ट आहे; दिल्लीत नाही.
फौजिया खान यांचे नक्की!
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरला. दुस-या जागेसाठी माजी राज्यमंत्री फौजिया खान शुक्रवारी अर्ज भरतील हे जवळपास नक्की आहे. काँग्रेसचा मात्र या जागेसाठी आग्रह कायम आहे.
कोण आहेत डॉ. कराड
डॉ. भागवत कराड हे बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण एमएसपर्यंत झाले आहे. १९९५ ते २००९ दरम्यान ते औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक होते. त्या काळात त्यांनी दोनवेळा महापौरपद आणि एकदा उपमहापौरपददेखील भूषविले. भाजप पक्षसंघटनेत विविध पदांवर काम केले आहे.
काँग्रेसतर्फे राजीव सातव
काँग्रेसला राज्यसभेच्या एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. या जागेसाठी हिंगोलीचे माजी खासदार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्ती राजीव सातव यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. ते शुक्रवारी अर्ज भरतील. सातव हे २००९ मध्ये कळमुनरीतून विधानसभेवर तर २०१४ मध्ये हिंगोलीतून लोकसभेवर निवडून गेले होते.माजी मंत्री रजनीताई सातव यांचे ते पुत्र आहेत.