बाळासाहेब मोदींबद्दल काय बोलले होते बघा; 'तो' व्हिडीओ दाखवत भाजपाचा सेनेवर बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 03:37 PM2019-01-08T15:37:43+5:302019-01-08T15:37:46+5:30
बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल
मुंबई: ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधतात. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, असंदेखील उद्धव ठाकरे अनेकदा भाषणांमधून मोदींवर शरसंधान साधताना म्हणतात. आता त्याच बाळासाहेबांच्या व्हिडीओचा आधार घेत भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यात बाळासाहेबांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये मोदींची आवश्यकता सांगितली आहे.
बाळासाहेब ठाकरेंची भाषणं म्हणजे धगधगता अंगार असायचा, हे भाजपाचे नेतेसुद्धा मान्य करतात. भाजपा राष्ट्रीय पक्ष असूनही त्यावेळी बाळासाहेबांचा दरारा इतकी होता की भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेते नियमितपणे मातोश्रीवर यायचे. बाळासाहेबांचे शब्द अगदी धारधार असायचे. त्यामुळे भाजपानं शिवसेनेवर बाण सोडण्यासाठी बाळासाहेबांचा आधार घेतला आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओत बाळासाहेब नरेंद्र मोदींचं कौतुक करत आहे. 'मेरा कहना इतना ही है. यही है की नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया. हे माझं वाक्य आहे. जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला. हे माझं वाक्य आहे आणि ते मी आडवाणींपाशी बोललेलो आहे,' असं बाळासाहेब व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.
मोदींना बाजूला केलंत, तर गुजरात तुमच्या हातून जाईल, असं बाळासाहेब म्हणाले होते, याची आठवणं भाजपानं शिवसेनेला करुन दिली आहे. त्यावेळी जशी गुजरातला मोदींची गरज होती, तशीच आता देशाला मोदींची गरज आहे. अन्यथा देश हातून जाईल, असा अप्रत्यक्ष संदेश या व्हिडीओतून शिवसेनेला आणि जनतेला देण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून करण्यात आला आहे. बाळासाहेबांचेच शब्द घेऊन भाजपानं शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना सतत भाजपा आणि मोदींवर तोंडसुख घेत असते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राम मंदिराचा मुद्दा हाती घेत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा देत उद्धव यांनी अयोध्येचा दौरा केला. पुढील काही दिवसात ते मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही जाणार आहेत. युतीसाठी आमच्या मागे रोड रोमियोसारखे फिरू नका, अशी विधानं शिवसेना नेत्यांकडून केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ वायरल झाला आहे.