Budget 2019: मोदी सरकार मांडणार पूर्ण अर्थसंकल्प? दलित, ओबीसी असणार केंद्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 06:22 AM2019-01-27T06:22:57+5:302019-01-27T06:23:51+5:30
पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यासाठी भाजपा नेते आग्रही
नवी दिल्ली: गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी मतदारांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लेखानुदानाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. तर संसदीय परंपरांचं उल्लंघन करु नका, अशा इशारा काँग्रेसनं भाजपाला दिला आहे.
निवडणुकीआधी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पासाठी लेखानुदान शब्द वापरण्यावर भाजपामधील काही नेत्यांनी आक्षेप घेतला. 1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्पाप्रमाणेच असावा, असं भाजपामधील काही नेत्यांना वाटतं. या अर्थसंकल्पातून कराच्या बाबतीत काही सवलती देता येणार नाही. मात्र आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जावा, असं मानणारा मोठा वर्ग भाजपामध्ये आहे. या वर्गानं पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात यावा, असा सूर लावल्याचं वृत्त 'नवभारत टाईम्स'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
कोणत्याही अर्थसंकल्पाचा अर्थ पूर्ण अर्थसंकल्पच असतो. एक तारखेला सादर होणारा अर्थसंकल्प नेहमीसारखाच असेल अशी अपेक्षा आहे, असं भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलं. या अर्थसंकल्पातून मोदी सरकार दलित, ओबीसी, आदिवासी यांच्यासह व्यापारी, सवर्णांना दिलासा द्यायचा प्रयत्न करणार असल्याचं समजतं. भाजपाच्या या पूर्ण अर्थसंकल्पावर काँग्रेसनं आक्षेप घेतला. लेखानुदानाच्या परंपरेचं पालन करा, असा इशारा काँग्रेसनं दिला. मात्र काँग्रेसनं पूर्वी या परंपरेचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत, असं प्रत्युत्तर भाजपानं दिलं आहे.