गोरखपूर:उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी (UP Election 2022) दिवस जवळ येत चाललेत, तशी राजकीय समीकरणे आणि प्रचार हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. विरोधकांनी यावरून टीका केली असली तरी भाजप नेते मात्र केंद्रातील मोदी सरकारची पाठराखण करत आहेत. यातच आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी, पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी जेवढे काम केले आहे, तेवढे कोणत्याही शेतकरी नेत्याने केलेले नाही, असे म्हटले आहे.
गोरखपूर भागातील चंपा देवी पार्क येथील बुथ अध्यक्षांच्या अधिवेशनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा अधिक काम केले आहे, असे सांगत आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादासोबत आणि विरोधक वंशवादी राजकारणासोबत पुढे जात आहेत. आमच्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी ‘वंशवाद’ हेच सर्वस्व आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.
शेतकर्यांसाठी जर कुणी काही केले असेल तर ते मोदी आहेत
अनेक लोक शेतकर्यांचे नेते बनतात, पण शेतकर्यांसाठी जर कुणी काही केले असेल तर ते मोदी आहेत. भाजप ‘सबका साथ, सबका विश्वास’ हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना सोबत घेऊन जात असताना, विरोधक मतपेटीचे राजकारण करतात आणि केवळ ‘विशेष समाज आणि कुटुंबाची’ चिंता करतात. आम्ही प्रत्येकाच्या प्रगतीचा विचार करतो आणि ते त्यांच्या भावाचा आणि काकाचा विचार करतात. आता त्यांनी काकांबद्दलही विचार करणे सोडून दिले आहे, असा टोला नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांना लगावला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली असली, तरी शेतकरी नेते आणि आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. केंद्र सरकारच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले असले, तरी संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घेतली आहे.