नवी दिल्ली/मुंबई- शिवसेनेतील फुटीर गटातील १६ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या अपात्रता नोटिशीला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात विरणार नसल्याचे हे सोमवारी स्पष्ट झाले.
समोर येऊन बोला आपण मार्ग काढू; बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं पुन्हा आवाहन
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले असून ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडमोडींवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध मित्रत्त्वाचे आहेत. मी रात्री 12 वाजताही देवेंद्र फडणवीसांना फोन केला तरी ते माझा फोन घेतात. केवळ भाजपचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाहीत. तर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही अतिशय चांगले आहेत, असे म्हणत आम्ही फडणवीस यांची मदत घेतली तर चुकीचं काय, असं बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले.
आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं नाही. महाविकास आघाडीनं आपली नाटकं आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा, असं विधान दिपक केसरकर यांनी केलं आहे. तसंच अविश्वासदर्शक ठरावाबाबत बोलत असताना त्यांनी याबाबत आता थेट राज्यपालांनीच निर्णय घ्यावा असंही साकडं घातलं आहे.
महाराष्ट्रवापसीबद्दल राऊतांना विचारा-
आमच्या महाराष्ट्रावापसीबद्दलचा प्रश्न संजय राऊतांना विचारा. त्यांनीच लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. त्यामुळेच, आम्ही महाराष्ट्रात येत नाही. तसेच, तुमच्याकडे संख्याबळ नसतानाही कशाला सांगता, २१ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ५१ आमदार तुमच्यापासून दूर गेलेत हे कबुल करा, अशा शब्दात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना सुनावले.