येदियुरप्पांची खुर्ची वाचली? राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच भाजप अध्यक्षांनी केली तारीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:26 AM2021-07-26T00:26:23+5:302021-07-26T00:27:35+5:30
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जे पी नड्डा यांनी रविवारी कर्नाटकात राजकीय संकट असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच, मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी चांगले काम केले असल्याचे म्हटले आहे.
पणजी - कर्नाटकात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जे पी नड्डा (JP Nadda) यांनी रविवारी येथे राजकीय संकट असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच, मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी चांगले काम केले असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, पेगासस हेरगिरीच्या (Pegasus spy) मुद्द्यावर भाष्य करताना, या आरोपात काहीही तथ्य नाही, आता विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही, असेही नड्डा यावेळी म्हणाले.
आपल्या दोन दिवसीय गोवा दौऱ्याच्या शेवटी नड्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भाजप पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणारी गोवा विधानसभा निवडणूक (Goa assembly elections) मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वातच लढेल. मात्र, यासंदर्भातील औपचारीक निर्णय पक्षाचे संसदीय मंडळच घेईल. कर्नाटक मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘येदियुरप्पा यांनी चांगले काम केले आहे. कर्नाटक चांगले काम सुरू आहे. येदियुरप्पा आपल्या पद्धतीने गोष्टी सांभाळत आहेत.’’ यावेळी, कर्नाटकात काही राजकीय संकट आहे का? असे विचारले असता, ‘‘हे आपल्याला वाटत आहे, आम्हाला असे वाटत नाही,’’ असे ते म्हणाले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी म्हटले होते, की आज सायंकाळी भाजपच्या हायकमानकडून निर्देश येतील. यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. यातच जेपी नड्डा यांनी केलेले हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
कर्नाटकात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौडा पाटील यतनाल यांच्या नावाची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. तसेच निरानी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे नावही चर्चेत होते. यामुळे या दोघांपैकीच मुख्यमंत्री होणार की लिंगायत समाजाचा नेता सोडून अन्य कोणत्या समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळणार याची चर्चाही सुरू झाली होती.