नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ED) मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह काही मंत्री, सरकारी अधिकारी, दलाल आणि खासगी व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. याच दरम्यान 20 कोटी रुपयांहून अधिक रोकड, विदेशी चलन आणि सोने इत्यादी जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, छापेमारीत अनेक आपत्तीजनक दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ईडीने दावा केला आहे की, या छाप्यादरम्यान अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम स्टाफ सिलेक्शन कमिशन घोटाळ्याशी संबंधित असण्याची शक्यता ईडीला आहे.
रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या पथकाने बँक अधिकारी आणि नोट मोजणी यंत्रांची मदत घेतली. याशिवाय, त्यांच्याकडून 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अर्पिता मुखर्जीने इतके फोन का वापरले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे. यावरून आता भाजपानेममता बॅनर्जी आणि TMC वर हल्लाबोल केला आहे. "ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है" म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. बंगालमधील भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनीही ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नोटांच्या ढिगाऱ्याचे काही फोटोही शेअर केले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटमध्ये एसएससी घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीने 20 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत असं म्हटलं आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे राष्ट्रीय बोधचिन्ह असलेल्या पाकिटातही रोख रक्कम सापडली असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी आणखी दोन ट्विट केले, त्यापैकी एका ट्विटमध्ये त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अर्पिता मुखर्जीसोबतचा फोटो शेअर केला. तसेच त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि "ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है" असं देखील म्हटलं आहे. तसेच भाजपाचे नेते ताजिंदर सिंग सरन यांनी देखील ट्विटरवरून टीका केली आहे.
"लाच घेणारा छप्पर फाडके लाच घेतो हे आता ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांनी खरं करून दाखवलं, राज्याला लुटून खाणारे तृणमूलवाले आता ओरडून ओरडून ईडी आम्हाला घाबरवत असल्याचं म्हणत आहेत. भ्रष्टाचार 20-20" असं भाजपा नेत्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन शिक्षण मंत्री आमदार माणिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. स्पेशल ड्युटी पीके बंदोपाध्याय आणि तत्कालीन मंत्र्यांच्या खासगी सचिव सुकांता आचार्जी यांचा सहभाग आहे.