"भाजपाने पहिल्या यादीतच पराभव स्वीकारला, बंडखोरीच्या भीतीने..."; अखिलेश यादवांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:51 AM2024-03-03T10:51:29+5:302024-03-03T10:53:09+5:30
Akhilesh Yadav And BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने 195 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने 195 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने बंडखोरीच्या भीतीने अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कायम ठेवल्याने त्यांनी पराभव स्वीकारल्याचं या यादीवरून दिसून येतं असं म्हटलं आहे.
भाजपाने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यात यूपीमधील 51 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत यूपीतील बहुतांश जुन्या नावांचा समावेश असला तरी दिल्लीच्या पाच विद्यमान खासदारांपैकी चार खासदारांची तिकिट कापण्यात आलं आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, रमेश बिधुरी यांच्या नावांचा समावेश आहे.
भाजपाच्या या यादीबाबत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, "भाजपाच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रथमदर्शनी दिसून येते की, ही यादी फक्त त्या 195 जागांवर आली आहे जिथे भाजपाच्या विजयाची थोडीच शक्यता आहे. भाजपाने पहिल्या यादीतच आपला पराभव स्वीकारला आहे कारण बंडखोरीच्या भीतीमुळे, ते अशा लोकांना पुन्हा उमेदवारी देत आहे जे त्यांच्या संबंधित लोकसभा मतदारसंघात कोणतेही काम करत नाहीत किंवा भ्रष्टाचारामुळे त्यांनाच त्यांच्या तिकिटाची आशा नव्हती."
"जे इथून निघू पाहत होते त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पुन्हा लढण्यास सांगितले जात आहे. ही यादी आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्येही घोर निराशा झाली आहे, कारण त्यांना आपल्या बहुतांश खासदारांविरोधात वारे वाहत असल्याची जाणीव आहे. जे युवा भाजपा तिकीटाच्या आशेने भाजपाच्या प्रत्येक चुकीच्या कामाला पाठिंबा देत आहेत. तेही निराश होऊन निष्क्रिय होतील. भाजपाची उमेदवारांची यादी म्हणजे भाजपाची निराशाच आहे" असं देखील अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोग या महिन्याच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार असून एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या, परंतु सध्या पक्षाकडे 290 खासदार आहेत. अलीकडेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काही खासदारांनी राजीनामे दिले होते, त्यामुळे संख्या घटली आहे.