पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर, भाजपच्या अनेक नेत्यांनी टीएमसीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. भाजपमधील नेत्यांचे राजीनामा सत्र अद्यापही सुरूच आहे. आता तर पश्चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्याबद्दलही ते टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
टीएमसी मध्ये सामील होऊ शकतात अर्जुन सिंह -एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी, आपण संघटनेत एका वरिष्ठ पदावर असूनही आपल्याला व्यवस्थित काम करण्याची परवानगी दिली जात नाही, असे म्हटले आहे. याचवेळी त्यांनी राज्यातील भाजप नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले. ते लवकरच तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील होण्याची शक्यता असल्याचे, सूत्रांचे म्हणणे आहे.
तागाचे दर वाढविण्याची केली होती मागणी - केंद्र सरकारने शुक्रवारी तागाच्या किंमती 6,500 रुपये प्रति क्विंटलवर मर्यादित ठेवण्यासंदर्भातील अधिसूचना परत घेण्याची घोषणा केली. यानंतर सिंह यांनी भाष्य केले होते. यासंदर्भात अर्जुन सिंह आणि इतर काही उद्योजक गेल्या काही आठवडवड्यांपासून मागणी करत आहेत.
जेपी नड्डा यांची घेतली भेट - सिंह म्हणाले, मी नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना राज्य भाजप संदर्भात काही माहिती दिली. समर्पित कार्यकर्त्यांना योग्य मान्यता दिली जात नाही. प्रदेश उपाध्यक्ष असूनही मला नीट काम करू दिले जात नाही. अर्जुन सिंह हे 2019 मध्ये टीएमसीमध्ये आले होते.