मुंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रताप लोढा यांनी गृहमंत्री अमित शहांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी शहांकडे एक महत्त्वाची मागणी केली. मुंबईतील जिन्ना हाऊसचं रुपांतर दक्षिण आशिया कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्याची मागणी लोढा यांनी शहांकडे केली. पाकिस्तानचे राष्ट्रपिता मोहम्मद अली जिन्ना यांच्यामुळे देशाची फाळणी झाली. त्यामुळे जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीमागील कटाची आठवण करून देणारं ठिकाण असल्याचं लोढा यांनी याआधी म्हटलं आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले मंगल प्रभात लोढा विधानसभेत मलबार हिल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. जिन्ना हाऊस याच मतदारसंघात येतं. मोहम्मद अली जिन्ना यांच्यामुळे देशाची फाळणी झाली. त्यामुळे त्याचं निवासस्थान फाळणीच्या जखमांची आठवण करून देणारं आहे, अशी भूमिका लोढा यांनी मांडली. जिन्ना हाऊसचं रुपांतर दक्षिण आशिया कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्यात यावं अशी मागणी लोढा यांनी गृहमंत्री शहांकडे केली.
जिन्ना हाऊसचं रुपांतर कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्याची मागणी लोढा यांनी २०१८ मध्येही केंद्राकडे केली होती. 'जिन्ना हाऊस देशाच्या फाळणीच्या कटकारस्थानाचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याचं रुपांतर कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्यात यावं. जिन्ना हाऊसला 'दक्षिण आशिया कला आणि सांस्कृतिक केंद्र' करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारनं सुरू करावी' अशी मागणी लोढा यांनी जानेवारी २०१८ मध्येही केली होती. त्यासाठी त्यांनी संबंधित पदाधिकारी आणि मंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र साडे तीन वर्षांमध्ये त्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही.