हैदराबाद - तेलंगणातील एकमेव भाजपा आमदार आणि हैदराबादच्या घोशामहल मतदारसंघाचे लोकप्रतनिधी टी राजासिंह हे पोलिसांच्या मारहाणीत किरकोळ जखमी झाले आहेत. वीरांगना राणी अवंतीबाई यांचा पुतळा बदलण्यासाठी गेले असता, जमावाची अडवणूक करताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये आमदार राजासिंह जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करुन मलमपट्टी करण्यात आली आहे.
राजासिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जुम्मेरत बाजार येथील राणी अवंतीबाई यांचा पुतळा गेल्या कित्येक वर्षांमुळे अस्वच्छ आणि विद्रुप अवस्थेत होता. त्यामुळे तो पुतळा हटविण्यासाठी आम्ही गेलो असता, तेलंगणा पोलिसांनी माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याच टी. राजासिंग यांनी म्हटले आहे. तसेच, पोलिसांकडून जाणीवपूर्वक मला लक्ष्य करण्यात येत असल्याचंही राजासिंग यांनी आपल्या ट्विटरवरुन म्हटलं आहे.
वीरांगणा राणी अवंतीबाई यांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं. त्या राणी अवंतीबाई यांची पुतळा बदलण्यासाठी आम्ही गेलो होतो. दर 5 वर्षांनी ही मूर्ती बदलण्यात येते, असे सांगूनही संबंधित पोलिसांनी आम्हाला तिथे मूर्ती बसवू दिली नाही. याउलट पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे राजासिंह यांनी म्हटले आहे. तसेच, पोलिसांनी दिलेला जवाब खोटा असून पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतरच मी हातात दगड घेतल्याचे राजासिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राजासिंह यांनीच स्वत:च दगडाने जखम करुन घेतली असून दगड मारल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.