नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळयात भाजपाच्या एका आमदाराने जोरदार गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नाही तसेच भूमीपूजन फलकावर आमदाराचं नाव लिहिलं नसल्याने त्यांना संताप अनावर झाला आहे. रमेश चंद्र मिश्रा असं या आमदाराचं नाव असून त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन प्रचंड गोंधळ घातला. फलकावर नाव नसल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. आमदाराने घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील बदलापूरमधील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहाय्याने शहीद स्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी (डीएम) दिनेश कुमार सिंह हे स्मारकाच्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण करणार होते. होम-हवन तसेच पुजेची सर्व तयारी कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती. याच दरम्यान आपल्याला या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेलं नाही तसेच फलकावर आपलं नाव नाही हे समजल्यानंतर रमेश चंद्र मिश्रा यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वाराचा कार्यक्रम असल्याची माहिती मिळताच मिश्रा संतप्त झाले. स्थानिक आमदार असूनही आपल्याला कार्यक्रमाला का बोलावलं नाही? अशी त्यांनी विचारणा केली. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या मंडळींना आणि अधिकाऱ्यांना याबाबत त्यांनी जाब विचारला. मतदारसंघात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधीचं नाव भूमीपूजन फलकावर असलं पाहिजे असं रमेश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.
गोंधळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याबाबत आपण तक्रार करणार असल्याचं देखील मिश्रा यांनी म्हटलं आहे. संतापाच्या भरात पुजेसाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती ती आमदारांनी लाथेने उडवली आहेत. तसेच खूप आरडाओरडा करत त्या ठिकाणी गोंधळ घातला. या संपूर्ण गोंधळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून भाजपा आमदारावर टीका केली जात आहे. तसेच भाजपातील काही लोकांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.