नवी दिल्ली: आगामी काळात लोकसभा निवडणूक होणार आहे. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष पावले टाकत असून मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधारी भाजपाने 'अब की पार ४०० पार'चा नारा दिला आहे. लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, एनडीए ४०० पार आणि भाजपा ३७० हून अधिक जागा जिंकेल असा मला विश्वास आहे. दिल्लीत भाजपाची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होत आहे. या बैठकीला देशभरातील भाजपा नेते हजेरी लावत आहेत. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजपा आमदार रिवाबा जडेजाने देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
दिल्लीत वृत्तसंस्था ANI शी बोलताना रिवाबाने गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. गुजरातमधील जामनगर येथील भाजपा आमदार रिवाबा म्हणाली की, राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. तरुण लोकप्रतिनिधींसाठी हे एक महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण अधिवेशन असेल यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातकडे नेहमीच आदर्श म्हणून पाहिले आहे. यावेळी भाजपाचा मोठा विजय होईल. 'अब की पार ४०० पार'... गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागांवर ५ लाखांहून अधिक मतांची आघाडी घेऊन भारतीय जनता पार्टीचा विजय होईल.
दरम्यान, ६ डिसेंबर १९८८ मध्ये रवींद्र जडेजाचा जन्म गुजरातच्या जामनगर येथील नवागाम गड सिटी येथील गुजराती राजपूत कुटुंबात झाला. रवींद्रने भारतीय सैन्यात जावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये रवींद्रची आई लता यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यावेळी रवींद्रने क्रिकेट सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. २०१६ मध्ये रवींद्र आणि रिवाबा यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव निध्याना असे आहे.