...अन्यथा मला फासावर लटकवा; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 09:33 PM2018-11-23T21:33:42+5:302018-11-23T21:40:27+5:30
उन्नावमधील कार्यक्रमात साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली: सध्या देशात राम मंदिराच्या मुद्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार आहेत. यावर आता भाजपा खासदार साक्षी महाराज यांना भाष्य केलं आहे. अयोध्या-काशी सोडा, आधी जामा मशीद पाडा, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. 'दिल्लीची जामा मशीद पाडा. तिथे मूर्ती सापडल्या नाहीत, तर मला फासावर लटकवा,' असंदेखील ते पुढे म्हणाले. उन्नावमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं.
'दिल्लीतली जामा मशीद पाडा. त्या मशिदीच्या पायऱ्यांखाली मूर्ती सापडतील. त्या ठिकाणी मूर्ती न सापडल्यास मला फासावर लटकवा,' असं वादग्रस्त विधान साक्षी महाराज यांनी केलं. 'मुघल काळात हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्यात आल्या. देशात मुघलांची सत्ता असताना मंदिरं पाडण्यात आली आणि त्याजागी मशिदी उभारण्यात आल्या,' असं साक्षी महाराजांनी म्हटलं. ते उन्नाव लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
साक्षी महाराज यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयावर शाब्दिक हल्ला चढवला. सर्वोच्च न्यायालय अनेकदा अनावश्यक प्रकरणांमध्ये निकाल देतं. मात्र अयोध्या प्रकरणात त्यांच्याकडून चालढकल सुरू आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा निषेध करतो, असं साक्षी महाराजांनी म्हटलं. काहीही करावं लागलं तरी, २०१९ च्या निवडणुकीआधी राम मंदिराची उभारणी सुरू केली जाईल, असं साक्षी महाराज म्हणाले.