नवी दिल्ली : भाजपा नेतृत्त्वावर नाराज असलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्याची दाट शक्यता आहे. मोदी सरकारवर अनेकदा 'शॉटगन' चालवणारे शत्रुघ्न सिन्हा 2019 मध्ये ईशान्य दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरु शकतात. त्यासाठी सिन्हा यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. सध्या भाजपाचे मनोज तिवारी ईशान्य दिल्लीचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे कायम भाजपा नेतृत्त्वावर निशाणा साधणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना 'खामोश' करण्याचं आव्हान तिवारी यांना पेलावं लागू शकतं. शत्रुघ्न सिन्हा आणि मनोज तिवारी मूळचे पूर्वांचलचे आहेत. त्यामुळे ईशान्य दिल्ली मतदारसंघात पूर्वांचलमधील नेत्यांची टक्कर पाहायला मिळू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाकडूनही या मतदारसंघातून एखाद्या पूर्वांचलचा उमेदवार दिला जाऊ शकतो. सध्या सिन्हा बिहारच्या पाटना साहिब मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र ते बऱ्याच काळापासून पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच ते अनेकदा विविध व्यासपीठांवरुन मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करतात. ईशान्य दिल्लीत मनोज तिवारी विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा अशी लढत होणार का, याबद्दल अद्याप काँग्रेस नेत्यांनी भाष्य केलेलं नाही. निवडणुकीच्या तोंडावर अशा चर्चा होत असतात, असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत. मात्र सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर लढणारच नाही, असंदेखील कोणी ठामपणे सांगायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आघाडी करणार असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसनं ही शक्यता फेटाळून लावली. त्यामुळेच काँग्रेसनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
शत्रुघ्न सिन्हा भाजपाशी उघड शत्रुत्व पत्करणार? काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 9:04 AM