'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 11:03 AM2019-03-24T11:03:27+5:302019-03-24T11:10:25+5:30
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते सांगतात; पण वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
कोलकाता - भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते सांगतात; पण वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. शनिवारी (23 मार्च ) कोलकातामध्ये 'एंगेजिंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या विषयावर स्वामी यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी 'पंतप्रधान मोदी असं का सांगतात, हे मला कळत नाही. जीडीपीनुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताची अर्थव्यवस्था सर्वात मोठी आहे' असं म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला. विनिमय दरांमध्ये सतत बदल होत असतात आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने जीडीपी गणनेच्या वैज्ञानिक पद्धतीच्या स्वीकारार्ह प्रक्रियेनुसार भारताची अर्थव्यवस्था ही सध्या सातवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. क्रयशक्ती क्षमता ही अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या गणनेची योग्य पद्धत आहे आणि त्याआधारे भारत सध्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे, असं ही स्वामी यांनी सांगितलं आहे.
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची समज नाही, अशा शब्दात काही महिन्यांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. 'द क्विंट'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी यासंदर्भात भाष्य केले होते. मुलाखतीच्या सुरुवातीला भाजपा मंत्र्यांवर टीका करणाऱ्या स्वामींना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला होता. हे करताना त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत समजून घेणारा एकही नेता विरोधी पक्षात नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
स्वामी यांनी पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. केवळ अर्थव्यवस्थेच्या कामगिरीवरून तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, असे स्वामींनी सांगितले होते. मोदी सरकारने हे लक्षात घेतले पाहिजे की अर्थव्यवस्थेतील कामगिरीवरुन कधीच निवडणुका जिंकता येत नाही. हे वाजपेयींनाही जमले नाही की नरसिंह राव किंवा मोरारजी देसाईंना. देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत. आता उर्वरित वर्षांत ते वेगाने पुढे जातील आणि चांगली कामगिरी करतील. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा चांगली कामगिरी करेल असा विश्वास स्वामींनी व्यक्त केला होता. भाजपाला लोकसभा निवडणुकीत 300 च्या आसपास जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते.