नवी दिल्ली: सीबीआयमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्यावर मोदी सरकारनं दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरुन दूर केलं. यावरुन आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे. सीबीआयनंतर आता पुढची कारवाई अंमलबजावणी संचलनालयातील (ईडी) अधिकाऱ्यांवर होईल, असं स्वामी यांनी म्हटलं आहे. सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर मोदी सरकारनं हस्तक्षेप केला. या दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरुन दूर करण्याची कारवाई सरकारकडून करण्यात आली. सरकारच्या या कारवाईवर सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली. सीबीआयनंतर पुढचा क्रमांक ईडीचा असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. सीबीआयपाठोपाठ ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच संपेल, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय; सुब्रमण्यम स्वामींकडून घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 9:07 AM