नवी दिल्ली : देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections in Five States)आणि संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक भाजपाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या 13 राज्यांमध्ये 3 लोकसभा आणि 29 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला संमिश्र कल मिळाला होता.
कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेली ही बैठक ‘हायब्रिड’ पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. त्याअंतर्गत दिल्लीतील बैठकीला काही सदस्य वैयक्तिकरित्या उपस्थित राहणार आहेत. तसेच, काही सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होतील. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या संबंधी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित गृहमंत्री शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे 124 सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
रिपोर्टनुसार, बैठकीची सुरूवात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने होणार आहे. तर शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतील. हा बैठकीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सदस्य राष्ट्रीय विषयांवर आणि अजेंड्यावर चर्चा करतील. तसेच, पार्टी मोदी सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' कार्यक्रमाचे बैठकीच्या ठिकाणी प्रदर्शन करेल. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, बैठकीत किमान एक राजकीय ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाची कामगिरी काही राज्यांमध्ये चांगली होती, तर काही राज्यांमध्ये अत्यंत खराब पाहायला मिळाली . आसाम आणि मध्य प्रदेशात पक्षाने विजय मिळवला, परंतु हिमाचल प्रदेशातील तीनही विधानसभा आणि लोकसभेची एक जागा गमावली. महाराष्ट्रातील देगलूर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या सुभाष साबणे यांना काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दादरा-नगर हवेलीमध्येही शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने धूळ चारली होती.