ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - अधिका-यांची नियुक्ती व त्यांच्या बदलीचा अंतिम अधिकार नायब राज्यपालांकडेच असे केंद्र सरकारने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केल्यानंतर चिडलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवरच तोफ डागली आहे. 'भ्रष्टाचारविरोधी कारवायांमुळे भाजपा नर्व्हस झाला आहे. आपल्या मर्जीतील अधिका-यांची नियुक्ती करण्याचा भाजपाचा डाव आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
केंद्र सरकारचे परिपत्रक संशयास्पद असून भ्रष्टाचारी अधिका-यांना पाठीशी घालण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. भाजपावाले विधानसभा निवडणूक हरले, आम्हाला तब्बल ६७ जागा मिळाल्याने त्यांना धक्का बसला. आता मोदी यांना दिल्लीतील भाजपाच्या तीन आमदारांच्या सहाय्याने सरकार चालवायचे आहे. आमचे सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याने मोदी सरकारचे धाबे दणाणले असून भ्रष्टाचारविरोधी कारवायमुळे ते नर्व्हस झाले आहेत, हे स्पष्ट होत असल्याचेही केजरीवाल म्हणाले. एकतर्फी परिपत्रक प्रसिद्ध करून त्यांना कोणत्या अधिका-यांना पाठीशी घालायचे आहे, तेही सांगावे, असा सवालही केजरीवाल यांनी केला.
तसेच आपले उपराज्यपालांशी कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.