नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या 7 महिन्यांवर आलेली असताना भाजपने सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, नव्या टीमसोबत निवडणुकीला सामोरे जाणे कठीण जाणार असल्याचा होरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याने काय करायचे असा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे.
पुढील लोकसभा निवडणूक मार्च, एप्रिलमध्ये होणार आहे. अशामध्ये भाजप नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत निवडणूक लढविण्यास अनुत्सुक आहे. यामुळे सध्याच्या टीमचीच मुदत वाढविण्य़ाचा निर्णय घेण्याची शक्यता असून शहा यांचा कार्यकाळ वाढणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली. यावेळी अमित शहा यांनी सांगितले की, 2019 मध्ये आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होऊ. या संकल्पाच्या ताकदीला कोणीही हरवू शकता नाही.