"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 08:23 AM2024-11-14T08:23:31+5:302024-11-14T08:25:16+5:30
Siddaramaiah : आजपर्यंत भाजप स्वबळावर राज्यात कधीही सत्तेवर आलेले नाही. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातूनच सत्तेवर आले, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
कर्नाटकात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची कुणकुण लागली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) मोठा आरोप केला असून काँग्रेसच्या ५० आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर देऊन विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तसेच, आजपर्यंत भाजप स्वबळावर राज्यात कधीही सत्तेवर आलेले नाही. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातूनच सत्तेवर आले, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर आपले सरकार पाडण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपने आमचे सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखवले, असे ते म्हणाले. तसेच, भाजपने प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपयांची ऑफर दिली आणि जवळपास ५० आमदाराना विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "हा पैसा येतोय कुठून? बीएस येडियुरप्पा आणि बोम्मई नोटा छापत आहेत का? या पैशाचा स्रोत काय? हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, जो भाजप नेत्यांकडे जमा झाला आहे. त्या पैशाचा वापर करून आमचे आमदार विकत घेत आहेत. भाजपच्या या प्रस्तावासाठी आमचे आमदार तयार नाहीत." दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचा हा प्लॅन अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याचे आणि त्यांना सत्तेवरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केले.
याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी भाजपची ही रणनीती लोकशाहीला मारक असल्याचे सांगत अशा कारवाया राज्याच्या स्थैर्याला आणि विकासाला बाधा आणत असल्याचे सांगितले. याशिवाय, भ्रष्टाचार आणि अस्थिरता पसरवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेऊन आपल्या सरकारला साथ द्यावी, जेणेकरून राज्यातील विकासकामे अखंडपणे सुरू राहतील, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.