वडोदरा - काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन प्रचार सभांचा धडाका लावला आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधीदेखील वारंवार गुजरातचा दौरा करत आहेत. सोमवारीदेखील राहुल गांधी यांनी येथील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत चर्चा केली.
यावेळी '2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून मी धडा घेतला आहे. भाजपानं मला खूप मदत केली. काँग्रेसचा पराभव माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरला. भाजपानं माझ्यावर प्रचंड टीका केली. मला धू-धू धुतले. या टीकेनं माझे डोळे उघडले,' अशी कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत.
यावेळी एका महिलेने राहुल गांधी यांना महागाईच्या समस्येवर तुम्ही कसा तोडगा काढणार? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर महागाई कशी कमी करणार याचा फॉर्म्युला सांगितला. पेट्रोल, डिझेलचे दर हा महागाईचा पाया आहे. आपल्या वापरातील प्रत्येक गोष्टीच्या किंमतीवर पेट्रोल व डिझेलच्या दराचा परिणाम होतो. काही वर्षांपूर्वी 140 डॉलर प्रति बॅरल असलेली पेट्रोलचे दर आता 50 डॉलर प्रति बॅरलपर्यंत उतरले आहेत. मात्र, त्याचा फायदा देशातील जनतेला मिळत नाही. तो कुणाला मिळतोय माहीत नाही. मला माहीत आहे पण मी नाव घेणार नाही,' असे सांगतानाच 'पेट्रोलला जीएसटीमध्ये आणल्यास किंमती उतरतील,' असेही ते म्हणाले.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, 5 ते 10वर्ष पुढचा विचार करणं हे एखाद्या नेत्याचं काम असतं. मात्र येथे सक्तीने धोरणांची अंमलबजावणी करुन जनतेच्या डोळ्यात पाणी आणलं जात आहे. रोजगाराच्या बाबतीत भाजपापेक्षा काँग्रेस सरकारची कामगिरी चांगली होती, असा दावाही यावेळी राहुल गांधींनी केला.