'एअर स्ट्राइक'वरून भाजपामध्येच मतमतांतरं; अध्यक्ष-उपाध्यक्षांपैकी कोण खोटं, कोण खरं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:47 PM2019-03-04T12:47:55+5:302019-03-04T12:48:55+5:30
अमित शहांकडे मृत दहशतवाद्यांचा आकडा; पण सरकार म्हणतं आकडा माहीत नाही
bjp president amit shah and union minister s s ahluwalia makes different claims on air strike
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकवरुन जोरदार राजकारण सुरू आहे. हवाई दलाच्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले, याचा आकडा सैन्याकडून जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्याच आठवड्यात हवाई दलाचे व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र असा आकडा सांगणं योग्य होणार नाही, असं कपूर म्हणाले होते.
हवाई दलानं मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा जाहीर केलेला नसला तरी, भाजपानं या हल्ल्यावरुन दावे सुरू केले आहेत. काल रात्री अमित शहा अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 250 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा त्यांनी केला. हवाई दलानं केलेला हल्ला अतिशय यशस्वी ठरला. या हल्ल्यात हवाई दलाचं कोणतंही नुकसान झालं नाही, असंदेखील शहा म्हणाले.
भाजपा अध्यक्ष 250 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं विधान करत असताना भाजपाचेच उपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी मात्र वेगळीच माहिती दिली. हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशानं करण्यात आला नव्हता, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. 'भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करू शकतो, हा संदेश देण्यासाठी एअर स्ट्राइक करण्यात आला,' असं अहलुवालिया म्हणाले. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याचा आकडा पंतप्रधान किंवा कोणत्या सरकारी प्रवक्त्यानं दिलेला नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले.
भाजपा अध्यक्ष अमित शहा 250 हून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करत असले, तरी त्यांच्याच पक्षाचे उपाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले, याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. पंतप्रधान, मंत्री किंवा सरकारच्या प्रवक्त्यानं याबद्दलचा आकडा जाहीर केलेला नाही, असं खुद्द केंद्रीय मंत्री सांगत आहेत. याशिवाय हवाई दलानंदेखील मृत दहशतवाद्यांचा नेमका आकडा जाहीर केलेला नाही. त्यामुळे 250 हून अधिक दहशतवादी मारले गेले, हा आकडा अमित शहांना कुठून मिळाला? भाजपाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांपैकी नेमकं कोण खरं आणि कोण खोटं? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.